अनुभवाची शिदोरी तोकडी पडली:अजित पवारांचे विमान चालवणारी पायलट शांभवी पाठक कोण?

अनुभवाची शिदोरी तोकडी पडली:अजित पवारांचे विमान चालवणारी पायलट शांभवी पाठक कोण?
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी घटना आज सकाळी घडली. विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत्यू झाला असून संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. अजित पवारांचे विमान बारामती येथे लँड होत असतानाच भीषण अपघात झाला आणि होत्याचे नव्हते झाले. या अपघातात अजित पवार, पायलट कॅप्टन सुमित कपूर, शांभवी पाठक यांच्यासह 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यात पायलट कॅप्टन सुमित कपूर यांना 16000 तासांचा मोठा अनुभव होता, तर शांभवी पाठक यांना 1500 तासांच्या फ्लाइट सेवेचा अनुभव होता. परंतु, काळाने घाला घातला आणि राज्याचे मोठे नुकसान झाले. कॅप्टन सुमित कपूर हे अजित पवारांच्या विमानाचे मुख्य पायलट होते, तर शांभवी पाठक ही सहपायलट होती. शांभवी यांनी 2020 ते 2022 या कालावधीत मुंबई विद्यापीठातून एरोनॉटिक्स, एव्हिएशन एरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी' या विषयात बीएससी पदवी संपादन केली असून, त्यापूर्वी 2018-19 या काळात त्यांनी न्यूझीलंड इंटरनॅशनल कमर्शियल पायलट अकॅडमीतून विमानचालनाचे विशेष प्रशिक्षण पूर्ण केले होते. आपल्या याच शैक्षणिक कौशल्याच्या जोरावर त्या 2022 पासून 'VSR Ventures' प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत 'फर्स्ट ऑफिसर' (वैमानिक) म्हणून कार्यरत राहून आपली व्यावसायिक सेवा देत होत्या. शांभवी यांनी आपले शिक्षण मुंबईतून पूर्ण केले असून त्यांचे वडील सैन्य दलात अधिकारी म्हणून कार्यरत होते. व्यावसायिक स्तरावर शांभवी यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये 'ए-320' (A-320) विमानाचे जेट ओरिएंटेशन प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले होते, तर मार्च 2022 मध्ये त्यांना स्पाईसजेटकडून 'एव्हिएशन सेक्युरिटी'चा परवानाही प्राप्त झाला होता. या तांत्रिक कौशल्यांच्या जोरावर त्या 'व्हीएसआर व्हेंचर्स' (VSR Ventures) या कंपनीशी जोडल्या गेल्या होत्या, ज्याची अधिकृत माहिती त्यांनी स्वतःच्या लिंक्डइन प्रोफाइलवर नमूद केली आहे.