अराजक:जमाव मागे लागल्यामुळे हिंदू तरुणाची कालव्यात उडी; मृत्यू, बांगलादेशात हिंसाचार बेलगाम
बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंविरुद्धचा हिंसाचार आता अनियंत्रित झाला आहे. ताज्या घटनेत नवगाव जिल्ह्यातील महादेबपुरा येथे मिथुन सरकार (२५) या हिंदू तरुणाला उन्मादी जमावाने घेरले. मारेकऱ्यांच्या तावडीतून वाचण्यासाठी मिथुनने तिथून पळ काढत कालव्यात उडी मारली. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने मिथुनचा बुडून मृत्यू झाला. मिथुन हा कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य होता, असे त्याची बहीण बैसाखी हिने सांगितले. तो मजुरी करून घरी परतत असताना जमावाने चोरीचा खोटा आरोप करून त्याच्यावर हल्ला केला. बैसाखीने सवाल केला की, “जर माझा भाऊ गुन्हेगारी कृत्यांत सामील होता तर त्याच्याविरुद्ध आतापर्यंत एकही गुन्हा का नोंदवलेला नाही?” बांगलादेशात गेल्या २० दिवसांत हिंदूच्या हत्येची ही ७ वी घटना आहे. कट्टरपंथियांविरुद्ध तक्रार नाही हिंदूंविरुद्धच्या अलीकडील हिंसाचारात एकच विशिष्ट ‘पॅटर्न’ दिसून येत आहे. चट्टाग्रामचे प्राध्यापक कुशल चक्रवर्ती यांच्या मते, कट्टरपंथी हिंदूविरोधी भाषणे आणि द्वेषपूर्ण व्हॉट्सॲप संदेशांद्वारे लोकांना चिथावणी देतात. त्यानंतर एखाद्या हिंदूवर ईशनिंदा किंवा गुन्हेगारी प्रकरणाचा खोटा आरोप लावला जातो. आधीच चिथावणी मिळालेला जमाव मग संबंधित हिंदूवर जीवघेणा हल्ला करतो. मेमनसिंग आणि इतर ठिकाणच्या घटनांमध्येही हाच पॅटर्न पाहायला मिळाला आहे. हिंदू-बौद्ध-ख्रिश्चन कौन्सिलचे सरचिटणीस मोहिंदर कुमार यांचा आरोप आहे की, कट्टरपंथियांविरुद्ध सहसा गुन्हा दाखल केला जात नाही आणि गुन्हा दाखल झाला तरी अटक होत नाही. ‘नव्या बांगलादेशात’ अल्पसंख्याक हिंदूंचे आयुष्य हिंसक जमावाच्या हाती सोपवले गेले आहे. अमेरिकेचा बांगलादेशींना दणका; व्हिसा बाँड भरल्यावरच एन्ट्री वॉशिंग्टन| अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बांगलादेशी नागरिकांना पौणे ३ लाख रुपयांचा व्हिसा बाँड भरल्यावरच देशात प्रवेश देण्याची घोषणा केली आहे. हा बाँड बी१/बी२ म्हणजेच टुरिस्ट व्हिसासाठी असेल. बांगलादेशसह नेपाळ आणि भूतानसह ३१ देशांतील नागरिकांनाही ही बाँड फी भरावी लागणार आहे. विशेष म्हणजे, व्हिसा बाँड फी लागू करण्याची ही पहिलीच वेळ आहे.