दारुड्या पतीने पेट्रोल टाकून पत्नीला पेटवले:महिला गंभीर जखमी, आरोपीविरोधात गुन्हा दाखल
गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अलहिलाल कॉलनीत एका ४५ वर्षीय महिलेला तिच्याच पतीने पेट्रोल टाकून पेटवून दिले. या घटनेत महिला मोठ्या प्रमाणात भाजली आहे. या प्रकरणी महिलेच्या जबाबावरून गाडगेनगर पोलिसांनी तिच्या ५० वर्षीय पतीविरुद्ध खुनाचा प्रयत्न करणे, या कलमान्वये शनिवारी (दि. २०) गुन्हा दाखल केला आहे. जखमी महिलेचा पती दारू पिऊन त्रास देत असल्याने तिचे त्याच्यासोबत पटत नाही. म्हणूनच ही महिला तिच्या दोन मुलांना घेऊन पतीपासून वेगळी राहते. दरम्यान १९ सप्टेंबरला रात्री १० वाजता महिलेच्या घरी तिचा पती दारू पिऊन आला. त्यावेळी त्याने एका प्लास्टिक पिशवीत पेट्रोल आणले होते. ती पेट्रोल भरलेली पिशवी महिलेच्या अंगावर फेकली. ती महिलेच्या पाठीवर लागली व फुटली. त्यामुळे महिलेच्या शरीरावर पेट्रोल उडाले. त्यावेळी तिच्या पतीने लायटरद्वारे पत्नीच्या शरीराला आग लावली. यात महिलेची पाठ, मान, उजवा हात, दोन्ही कान, मांडी व शरीराच्या अनेक भागाला जखम झाली. या महिलेवर उपचार सुरू असून तिच्या जबाबावरून गाडगेनगर पोलिसांनी पतीविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल केला आहे.