गौरव:यशस्वी व्यक्तीच्या पाठीशी शिक्षकांच्या आशीर्वादाचे बळ

गौरव:यशस्वी व्यक्तीच्या पाठीशी शिक्षकांच्या आशीर्वादाचे बळ
प्रतिनिधी | शेवगाव शिक्षकांचा त्याग व समर्पण हा समाज उभारणीचा पाया असतो, कोणत्याही यशस्वी व्यक्तीच्या पाठीशी शिक्षकांच्या आशीर्वादाचे बळ असते, असे प्रतिपादन शेवगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनल शहा यांनी केले. येथील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात शेवगाव पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित शिक्षक सन्मान कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान -२ मधील जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक विजेत्या जि. प. प्राथमिक शाळा वरूर बुद्रुक तर तालुका स्तरावर प्रथम क्रमांक विजेत्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाडगव्हाण, द्वितीय क्रमांक जि.प. प्रा. शाळा ढोरजळगावशे, तृतीय क्रमांक जि.प. प्रा. शाळा तळणी अशा आहेत. या बरोबरच केंद्रस्तरीय विजेत्या शाळा तसेच माध्यमिक स्तरावर तालुकास्तरावर प्रथम क्रमांक विजेत्या रेसिडेन्सिअल विद्यालय, शेवगाव, द्वितीय क्रमांक डॉ. बाळासाहेब विखे विद्यालय शेवगाव, तृतीय क्रमांक न्यू इंग्लिश स्कूल, खरडगाव या शाळां असून या शाळांना स्मृतीचिन्हे, प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या शाळांना बक्षिसाची रक्कम शाळेच्या बॅंक खात्यावर या वर्ग करण्यात आली होती. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र आयोजित शिक्षकांसाठी दर्जेदार व्हीडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ मधील तालुकास्तर विजेत्या ४४ शिक्षकांचा स्मृतीचिन्हे, प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी अमरापूरच्या सरपंच आशा गरड, प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक रमेश गोरे, केंद्र प्रमुख रघुनाथ लबडे, विष्णू गायकवाड, सुखदेव डेंगळे, बाडगव्हाणचे कृष्णाजी गरूड, शिवाजी कदम, हनुमंत काजळे, माधव भोसले, लक्ष्मण पोपळघट, बाडगव्हाण शाळेचे मुख्याध्यापक राजू साळवे उपस्थित होते. सूत्रसंचालन मुकूंद अंचवले यांनी, तर आभार विष्णू गायकवाड यांनी मानले. प्रास्ताविक करताना गटशिक्षणाधिकारी शैलजा राऊळ यांनी शेवगाव तालुक्यातील उपक्रमशील शिक्षक व शाळा यांचा गौरवपर उल्लेख करून तालुक्याचा गुणवत्तास्तर उंचावण्यासाठी केंद्र प्रमुख व प्रशासकीय यंत्रणा घेत असलेल्या कामाचा आलेख मांडला.