नवरात्रात समाजजागृती:व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रूणहत्या निर्मूलनावर पथनाट्य

नवरात्रात समाजजागृती:व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रूणहत्या निर्मूलनावर पथनाट्य
शहरात सुरू असलेल्या नवरात्रोत्सवाला धार्मिक आणि सांस्कृतिक रंगत तर लाभलीच, पण यंदा सामाजिक भान जागविणाऱ्या एका उपक्रम राबविण्यात आला. विदर्भाची महाराणी असा लौकिक असणाऱ्या अंबानगरी नवदुर्गोत्सव मंडळाच्या प्रांगणात ओबीजिवाय सोसायटीच्या वतीने व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रूणहत्या व पर्यावरण संवर्धन या विषयांवर आधारित समाजप्रबोधनपर पथनाट्य सादर कर ण्यात आले. या वेळी ओबीजीवाय संघटनेचे अध्यक्ष डॉ. पूनम बेलोकार, डॉ. मोनाली ढोले, त्यांनी आपल्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह मिळून समाजहिताचा संदेश देणारे पथनाट्य तयार करून मंचावर सादर केले.या पथनाट्यातून नशा आणि व्यसनमुक्तीतून नवजीवन साकारूया, स्त्रीभ्रूणहत्या थांबवून सृष्टी वाचवूया. असा प्रखर संदेश देण्यात आला. वाढत्या व्यसनाधीनतेमुळे उद्भवणाऱ्या समस्या, घरांचे होणारे विघटन आणि तरुण पिढीचा होणारा नाश यावर प्रभावी प्रकाश टाकण्यात आला. त्याचबरोबर अजूनही अनेक ठिकाणी सुरू असलेली स्त्रीभ्रूणहत्या ही मानवी समाजासाठी लाजिरवाणी बाब असल्याचे दाखवून मुलगी वाचवा हा जनजागृतीपर संदेश दिला. शाळा क्रमांक ६ च्या प्रांगणात सादर झालेल्या या प्रभावी नाट्यप्रयोगात दिव्या मेहरे, सलोनी दवंडे, सेजल देहनकर, शीतल वैष्णव, वैष्णवी चौधरी, पल्लवी, सेजल कांबळी, अरबाज शाह, प्रतीक मनोहर, नैना रामटेके, गौरी गिरणारे, राहुल सरदार, अनिल सिरसाट, शुभम टापरे, विलास खडसे, आदींनी सहभाग घेतला यावेळी सुनीता भेले, मुक्ता इंगोले, रोशनी धानोरकर, लीना महाजन, माया लकडे, क्षिप्रा मानकर, संगीता बुरंगे उपस्थित होते. या सर्वांनी अभिनयातून नागरिकांच्या मनाला चटका लावणारा, विचार करायला लावणारा संदेश दिला.कार्यक्रमाला उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. अनेकांनी धार्मिक उत्सवात आरती, पूजाअर्चा मर्यादित न ठेवता समाजाला दिशा देणारा संदेश देणे ही खरी देवसेवा आहे” अशा प्रतिक्रिया दिल्या. नवरात्रोत्सवा सारख्या भक्तिमय वातावरणात समाजजागृतीचा अनोखा संगम घडवून ओबीजिवाय सोसायटी व ढोले रुग्णालयाने एक आदर्श निर्माण केला आहे. व्यसनमुक्ती व स्त्रीभ्रूणहत्या निर्मूलनासारख्या ज्वलंत प्रश्नांवर केलेला हा प्रभावी नाट्यप्रयोग अमरावतीकरांसाठी केवळ प्रबोधन नव्हे, तर एक जीवनदायी प्रेरणा ठरला आहे.