साळवे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी जामखेड बंद:आरोपींना १२ तासांत अटक करण्याची मागणी

साळवे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी जामखेड बंद:आरोपींना १२ तासांत अटक करण्याची मागणी
प्रतिनिधी | जामखेड रिपाइं जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबीयांवर झालेल्या हल्ल्यातील आरोपींना बारा तासात अटक करा व त्यांच्यावर मोक्का अंतगर्त कारवाई करावी, अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने करण्यात आली. मागणी पूर्ण न झाल्यास राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी दिला. साळवे यांच्या कुटुंबियांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ७ रोजी कडकडीत जामखेड बंद पाळण्यात आला. तसेच येथील खर्डा चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नान्नज (ता.जामखेड) येथे २४ ऑगस्ट रोजी साळवे यांच्या कुटुंबावर काही गावगुंडानी शस्त्रांसह प्राणघातक हल्ला केला. यात कुटुंबातील काही सदस्य गंभीर जखमी झाले. त्यासंबंधी पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न करणे व ॲट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल आहे. २६ ऑगस्टला समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना निवेदन दिले होते. आठ दिवसांत आरोपी अटक करा अन्यथा जामखेड बंद ठेवू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले यांनी दिला होता. परंतु १४ पैकी ६ आरोपींना अटक केली आहे. अद्याप उर्वरित आरोपींवर अटकेची कारवाई झाली नाही. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते अरुण जाधव, माजी प्रा. सुनिल जावळे, पोपट फुले, पत्रकार बाळासाहेब शिंदे, माजी नगराध्यक्ष निखिल घायतडक, समता ग्रुपचे अध्यक्ष संतोष गव्हाळे, राजन समिंदर, रवी सोनवणे, किशोर कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. साळवे कुटुंबियांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ जामखेड बंद पाळण्यात आला.