श्री विठ्ठल, रूक्मिणी मातेला अलंकार परिधान
दोन दिवसांपासून सुरू झालेल्या दीपावली सणातील नरकचतुर्दशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला परंपरेप्रमाणे पोशाख आणि श्री माता रुक्मिणीला अलंकार करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी दिली. श्री विठ्ठलाला सोन्याचा मुकुट, नाम निळाचा, कौस्तुभ मणी, दंड पेट्या जोड मोठा, हिऱ्याचा कंगण जोड, मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी एक पदरी, मोत्याची कंठी दोन पदरी, नेकलेस, शिरपेच मोठा १० लोलक असलेला, मस्त्य जोड, तोडे जोडे, सूर्य कळ्यांचा हार, सोन्याचे पैंजण जोड, तुळशीची माळ एक पदरी, नक्ष्मी टोप आदी अलंकार परिधान करण्यात आले. श्री रुक्मिणी मातेला सोने मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवामनी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मी हार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा आदी अलंकार परिधान करण्यात आले आहेत. परिवार देवतांपैकी असलेल्या श्री. राधिका मातेस नक्षी टोप, ठुशी नवीन, मोत्याचा कंठा मोठा, पुतळ्यांची माळ व सत्यभामा मातेला सिद्धेश्वर टोप, मोत्याचा कंठा, ठुशी नवीन, पुतळ्यांची माळ आदी अलंकार परिधान करण्यात आले. श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे पारंपरिक अलंकाराच्या वेशातील मनमोहक रुप पाहणे व दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.